डॉ आंबेडकर यांना जगात सर्वोच्च स्थान मिळेल :- भगतसिंह कोशियारी
130 व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन
मुंबई भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. १४) चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.
कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय समाज कल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
भगवान बुद्ध, महावीर यांची महत्ता लोकांना काही कालखंड उलटून गेल्यानंतर कळली. त्याचप्रमाणे जसजसा काळ लोटेल, तसतशी सर्व जगाला डॉ आंबेडकर यांची महानता कळेल व त्यांना जनमानसात सर्वोच्च स्थान मिळेल असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
प्रत्येक युगात अवतारी पुरुष जन्माला येऊन त्यांनी समाजातील कुप्रथा नष्ट करून नव्या समाजाचे सृजन केले आहे, असे सांगताना सध्याच्या युगात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक बहुविध प्रतिभेचे धनी, अर्थशास्त्री व विविध भाषांचे विद्वान या देशात जन्माला आले. डॉ. आंबेडकरांनी विविध देशांच्या राज्यघटनांचे अध्ययन करून देशाला जगात सर्वात सुंदर अशी राज्यघटना प्रदान केली असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
डॉ आंबेडकर यांचे साहित्य व चरित्राचे वाचन प्रत्येकाने केले पाहिजे व त्यांच्या संकल्पनेतील भारताच्या निर्मितीसाठी काम केले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.
या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे अतिथी संपादक असलेल्या ‘काळाच्या पलीकडचा महामानव’ या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बौद्ध धर्मगुरूंना चिवरदान (पवित्र वस्त्र दान) करण्यात आले.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें